ताजी बातमी ऑनलाईन टीम
पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार सत्तेवर आल्यानंतर एकीकडे खलिस्तानवाद्यांच्या कारवायांनी डोके वर काढले आहे, तर दुसरीकडे गुन्हेगारी टोळ्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. प्रश्न असा आहे की, पंजाबी चित्रसृष्टीला विळखा घालणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचा नायनाट कसा करायचा? सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येने हा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला आहे. एक काळ असा होता की, हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलीवूडला गुन्हेगारी जगताने कराल विळखा घातला होता. त्यावेळी प्रामुख्याने डी गँग अर्थात दाऊद इब्राहिमच्या टोळ्यांची प्रचंड दहशत होती. अनेक तारे-तारका भय किंवा अन्य कारणाने या गँगस्टरच्या आदेशाबरहुकूम काम करत असल्याचे चित्र होते. आता तसाच प्रकार पॉलीवूडच्या म्हणजे पंजाब चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतो आहे. त्यातही गायकांना खंडणीसाठी धमकावले जात आहे.
काही काळापूर्वी पंजाबी अभिनेते परमीश वर्मा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. पाठोपाठ गिप्पी ग्रेवाल यांना धमकावण्यात आले. त्याचवेळी सिद्धू मुसेवाला यांनाही धमकावण्यात आले होते. अखेर 29 मे रोजी दिवसाढवळ्या त्यांची हत्या करण्यात आली आणि भय इथले संपणार नाही, याची दाहक प्रचिती आली. परमीश वर्मा यांच्यावर मोहालीत गोळीबार झाला आणि दैव बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचे एकमेव कारण म्हणजे खंडणी. याला गुन्हेगारी जगतात प्रोटेक्शन मनी असे गोंडस नाव देण्यात आले आहे. परमीश यांच्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर दिलप्रीत बाबाने याने घेतली होती. पंजाबी गायक-अभिनेता गिप्पी अग्रवाल यांनाही धमकावण्यात आले होते. त्यांच्याकडूनही खंडणी वसूल करण्यात आल्याची वदंता आहे. तथापि, आपण आपला जीव वाचवण्यासाठी गँगस्टरना पैसे दिले, ही गोष्ट त्यांनी मान्यच केली नाही.