मे महिना संपून जून महिना सुरु झाला आहे. उकाड्यामुळे (Heat Wave) हैराण झालेला प्रत्येक जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. यावर्षी मान्सूनचे (Monsoon) आगमन लवकर होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पण मान्सूनचा प्रवास लांबला. येत्या काही दिवसांत मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon) दाखल होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे. अशात हवामान खात्याने पावसाबाबत काहिसा दिलासा देणारी माहिती सांगितली आहे. येत्या 5 दिवसांत राज्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याने (weather department) वर्तवली आहे. पण विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
मान्सून यंदा लवकर दाखल होणार होता. पण अनुकूल वातावरण निर्माण न झाल्यामुळे मान्सून गेल्या चार दिवस कर्नाटकातच थांबला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सून कर्नाटकातच थांबला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. जरी मान्सून उशीरा महाराष्ट्रात दाखल होणार असला तरी सुद्धा पुढील पाच दिवसांत राज्यातल्या अनेक भागात जोरदार मान्सूनपूर्व सरी बसरणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
पुढचे पाच दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पण विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे, असे हवामान खात्याने सांगितले. विदर्भात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. शनिवारी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली आहे. चंद्रपुरात 46 अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील नागरिक उकाड्याने हैराण झाले असून ते पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.