राज्यामध्ये पुन्हा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सरकार देखील सतर्क झाले आहे. सरकारकडून वारंवार नागरिकांना मास्कचा वापर करावा असे आवाहन केले जात आहे. आता राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होऊ लागली आहे. अशामध्ये आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. सध्या ते होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. त्यांनी ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोनासंबंधित औषधं आणि उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात जे कुणी आले असाल, त्यांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. सगळ्यांनी काळजी घ्यावी.’, असे आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांच्यापाठोपाठ त्यांची मुलगी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांनी खासगी रुग्णालयात न जाता सरकारी रुग्णालयात उपचार घेतलो होते. आता पुन्हा त्यांना कोरोना झाला असून त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे.