जून महिना उजाडताच विद्यार्थी-पालकांना शाळा सुरु होण्याचे वेध लागतात.. पुन्हा एकदा कोरोनाचे संकट गडद होत असले, तरी यंदा शाळा सुरु केल्या जाणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याआधीच स्पष्ट केलंय.. मात्र, या शाळा नेमक्या कोणत्या तारखेपासून सुरु होणार, याबाबत शिक्षकांसह विद्यार्थी व पालक संभ्रमात पडले आहेत..
शिक्षण विभागाने 11 एप्रिल रोजी काढलेल्या परिपत्रकात शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरु होणार, याबाबतची माहिती दिली होती. त्यानुसार, विदर्भातील तापमान विचारात घेता, तेथील शाळा 27 जूनपासून सुरू होणार आहेत, तर राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरू होणार असल्याचं म्हटलं होते.
13 जूनपासूनच शाळा उघडणार…
गेल्या वर्षीच्या वार्षिक निकालाच्या वेळीही शिक्षकांनी विद्यार्थी-पालकांना 13 जूनपासून शाळा सुरू होणार असल्याची सूचना केली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 15 जूनपासून शाळा सुरु होणार असल्याचे सांगितले.. त्यामुळे शाळा नेमक्या कोणत्या तारखेपासून सुरु होणार, असा प्रश्न शिक्षकांसह विद्यार्थी-पालकांना पडला होता.
याबाबत शालेय शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिलं असून, येत्या 13 जूनपासूनच शाळा सुरू होणार आहेत. तसेच, विदर्भातील शाळा 27 जूनपासूनच सुरु होणार आहेत.
दरम्यान, यापुढे दरवर्षीच जूनच्या दुसऱ्या सोमवारी राज्यातील शाळा सुरु होतील. सोमवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास, त्यापुढील दिवशी (मंगळवारी) शाळा सुरू होतील. विदर्भातील तापमानामुळे जूनच्या चौथ्या सोमवारी वर्ग भरतील, असे शिक्षण विभागाने जाहीर केलंय.
गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले असले, तरी सद्यस्थितीत शाळा पूर्ण क्षमतेने सुरू केल्या जाणार आहेत. मात्र, 13 जूनपर्यंत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास गेटवर स्क्रिनिंग, एका बाकावर एक विद्यार्थी, दोन सत्रांत शाळा, मास्क-सॅनिटायझेशनचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठीची नियमावली लवकरच जाहीर होणार आहे.