गेल्या काही दिवसांपासून वाढत्या क्रुड किमतींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अशातच आता एक मोठी माहिती हाती आली आहे. कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात 8 मार्च 2008 म्हणजे जवळपास 14 वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ जाऊन पोहचले आहेत. सोबतच डॉलरच्या तुलनेत रुपयाचीही विक्रमी घसरण सुरु आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डीझेलची दरवाढ अटळ आहे.
यापूर्वी 21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये घट करत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला होता. तेव्हापासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र 31 मे रोजी 24 राज्यांमधील सुमारे 70,000 पेट्रोल पंपांवर तेल विपणन कंपन्यांकडून (OMCs) पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन (All India Petrol Pump Association) केंद्र सरकारचा निषेध नोंदवत पेट्रोल पंप डीलर्सने पेट्रोल-डिझेलची (Petrol Diesel) खरेदी तेल कंपन्यांकडून केली नव्हती.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात आजही पेट्रोलचा दर 111 रुपयांच्या आसपास तर 97 रुपयांच्या आसपास आहेत. आता कच्च्या तेलानं पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठल्यानं केंद्रानं दिलेला दिलासा अगदीच औट घटकेचा ठरतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूने वाढणारे कच्च्या तेलाचे दर आणि दुसऱ्या बाजूने घसरणारा रुपया यामुळे देशातील ऑईल कंपन्यांना आणि पर्यायानं अर्थव्यवस्थेला दुहेरी फटका बसतोय.
बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात महागडे क्रूड आणि देशातील महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे किंवा वाढवणे सरकारसमोर कठीण परिस्थिती आहे.