ताजी बातमी ऑनलाईन टीम
तमाम महाराष्ट्रवासियांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. राज्याच्या सीमेवर गेला सुमारे आठवडाभर रुसून थबकलेला मान्सून येत्या दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात म्हणजे कोकणात दाखल होणार आहे; तसेच येत्या पाच दिवसांत राज्याच्या बहुतांश भागांतही पावसाच्या सरी बरसणार असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनच्या पारंपरिक वेळापत्रकानुसार तो एक जूनला केरळमध्ये येतो. यंदा मात्र तीन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला असल्याने महाराष्ट्रातही तो वेळेआधी पोहोचेल, असा अंदाज होता. मात्र, आपल्या लहरी स्वभावाची चुणूक त्याने दाखवून दिली आणि त्याची पावले मंद पडू लागली. महाराष्ट्राच्या सीमेवर तो सुमारे आठवडाभर थांबला. त्यामुळे आणखी काही दिवस मान्सूनची वाट पाहावी लागेल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत असतानाच त्याने पुन्हा सर्वांना झुकांडी दिली आणि त्यामुळे येत्या ४८ तासांत मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकच्या आणखी काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे पुणे वेधशाळेने गुरुवारी जाहीर केले.