केंद्र सरकारकडून दिशाभूल करणार्या जाहिरातींबाबत नवी नियमावली लागू करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता मोठी कारवाई होणार असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लहान मुलांना लक्ष्य करून दिशाभूल करणाऱ्या व सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये मुलांचे आरोग्य आणि पोषण यासंबंधी लाभांचे खोटे दावे करण्याच्या प्रकाराला आळा घालणे आणि त्यांना भेटवस्तूचे प्रलोभन दाखवून वस्तू आणि सेवा घेण्यास प्रवृत्त करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारकडून हि नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास सरकारकडून दंड देखील स्पष्टपणे दर्शवण्यात आला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण कोणत्याही दिशाभूल करणार्या जाहिरातींसाठी उत्पादक, जाहिरातदार आणि अनुमोदकांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते. त्यानंतरच्या उल्लंघनांसाठी, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण 50 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते. प्राधिकरण दिशाभूल करणार्या जाहिरातीचे समर्थन करणार्याला 1 वर्षापर्यंत कोणतेही अनुमोदन करण्यास प्रतिबंध करू शकते आणि त्यानंतरच्या उल्लंघनासाठी, प्रतिबंध 3 वर्षांपर्यंत वाढू शकतो.