महावितरणच्या भरारी पथकांनी 202122 मध्ये राज्यात तब्बल 557 दशलक्ष युनिट विजेची चोरी उघडकीस आणली आहे. उच्च व लघुदाब वर्गवारीत 22 हजार 987 ठिकाणी 317 कोटी 45 लाख रुपयांच्या वीज चोऱ्या पकडल्या आहेत. त्यापैकी 172 कोटी 45 लाख रुपयांची वसुली केली आहे. यामुळे महावितरणची वीजहानी कमी करण्यासोबत महसुलामध्ये वाढ होण्यास मदत होत आहे.
वीजचोरी विरोधात धडक कारवाई करण्यासाठी राज्यात परिमंडलस्तरावर 8, मंडलस्तरावर 20 तर विभागीयस्तरावर 40, असे एकूण 71 पथके तैनात केली आहेत. यात 345 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.
यामधील मंडलस्तरावरील 20 पथके नोव्हेंबरमध्ये नव्याने स्थापन केली आहेत. आतापर्यंत 2021-22 मध्ये सर्वाधिक 557.53 दशलक्ष युनिटची वीजचोरी उघड केली आहे. याआधी 168 दशलक्ष युनिटची वीजचोरी पकडली आहे. 2022-23 मध्ये 600 पेक्षा अधिक दशलक्ष युनिट वीजचारी उघड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याप्रमाणे कठोर कारवाई सुरू झाली आहे. विभागीयस्तरावर देखील अतिरिक्त पथके देण्यात यावी, असे आदेश दिल्यामुळे वीज चोरीविरूध्द महावितरणने अधिक आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.
गेल्या आर्थिक वर्षात कोकण प्रादेशिक विभागामध्ये 7834 ठिकाणी 152 कोटी 43 लाख, पुणे विभागात 5527 ठिकाणी 72 कोटी, नागपूर विभागात 5503 ठिकाणी 63 कोटी 23 लाख आणि
औरंगाबाद विभागात 4123 ठिकाणी 29 कोटी 80 लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघड केल्या आहेत. यामध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरू असलेल्या स्मार्ट चोऱ्या उघडकीस आणण्यात आल्या आहेत.