मागच्या काही दिवसांपासून पुणे, मुंबई सारख्या शहरांसहित राज्यामध्ये वाहतुकीचे नियम कडक केले आहेत. आता वाहतुकीचा आणखी एक नवा नियम समोर आला आहे. जर हा नियम पाळला नाही तर आपल्याला दंड होऊ शकतो. मोदी सरकार हे नागरिकांकडून वाहतूक नियमांचे पालन करवून घेण्याबाबत अत्यंत कडक आहे. 2019 साली सरकारने वाहतुकीचे काही नवीन नियम आणले आहेत.
यावेळी नियमांमध्ये दंडाची रक्कम ही अनेक पटींनी वाढवण्यात आली आहे. काही नियमांमध्ये थेट ड्रायव्हिंग लायसन्स (चालक परवाना) रद्द करण्यासह शिक्षेची देखील तरतूद केली आहे. केंद्र सरकारने वाहतुकीचा ड्रिंक अँड ड्राईव्ह नियम काही जाचक अटी वाढवून नवीन स्वरूपात आणला आहे. देशातली वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, रस्ते अपघातांचं प्रमाण कमी व्हावं, अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी व्हावी, लोकांना शिस्त लागावी यासाठी ड्रिंक अँड ड्राईव्ह नियम अत्यंत कडक करण्यात आला आहे.
दारू पिऊन वाहन चालवल्यास आता दंडाची रक्कम 10,000 रुपये इतकी असणार आहे. ही रक्कम पूर्वी अवघी 2,000 रुपये इतकी होती. आता मात्र तिच्यात 5 पटीने वाढ करण्यात आली आहे. यासोबतच 6 महिन्यांचा कारावास अशी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. जर समजा एकच व्यक्ती दुसऱ्यांदा मद्यपान करून वाहन चालवताना पकडला गेला तर त्याला 15,000 रुपयांचा दंड आणि सोबतच दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. मोटार वाहन कायदा 2019 च्या कलम 185 नुसार, तुम्ही दारू(अल्कोहोल) किंवा ड्रग्सच्या(अंमली पदार्थ) प्रभावाखाली असताना वाहन चालवणे बेकायदेशीर आहे.






