आताच्या काळात बहुतेक सर्व जण Google Drive वर आपले फोटोज अपलोड करून सेव्ह करत असतो. मात्र आता गुगलने Google Drive for Desktop आणि Google Photos यांच्यातील फोटो बॅकअप सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे
10 ऑगस्ट 2026 पासून Google Drive for Desktop अॅपमधून कंप्यूटरवरील फोल्डरमधील फोटो आणि व्हिडिओ Google Photos मध्ये आपोआप बॅकअप होणार नाहीत. त्यामुळे या सुविधेचा वापर करणाऱ्या युजर्सना आता बॅकअपसाठी Google Photos कडून दिलेला पर्याय वापरावा लागणार आहे.
नेमका काय बदलणार?
आजपर्यंत गुगल ड्राइव्ह फॉर डेस्कटॉप अॅपमध्ये संगणकावरील एखादा फोल्डर निवडून त्यातील फोटो आणि व्हिडिओ Google Photos मध्ये आपोआप बॅकअप करण्याची सुविधा उपलब्ध होती. त्यामुळे कॅमेरा, स्कॅनर किंवा इतर माध्यमातून संगणकावर सेव्ह केलेले फोटो क्लाउडवर आपोआप अपलोड करून सुरक्षित ठेवता येत होते.
मात्र 10 ऑगस्टनंतर ही ऑटोमॅटिक बॅकअप सुविधा काम करणार नाही. ड्राइव्ह फॉर डेस्कटॉप मध्ये फोटो बॅकअपसाठी निवडलेले फोल्डर तसेच राहिले, तरी त्यामध्ये पुढच्या काळात सेव्ह होणारे नवीन फोटो आणि व्हिडिओ Google Photos वर आपोआप अपलोड होणार नाहीत.
Google Drive किंवा Google Photos बंद होणार का?
तर नाही. हा बदल Google Drive किंवा Google Photos सेवा बंद करण्याबाबत नाही. गुगल ड्राइव्ह फॉर डेस्कटॉपमधून नेहमीप्रमाणे फाइल्स सिंक करता येतील. Google Photos अॅपमधून फोनवरील फोटोचा बॅकअपही पूर्वीप्रमाणे सुरू राहील. फक्त ड्राइव्ह फॉर डेस्कटॉपमधून Google Photos मध्ये फोटो आपोआप अपलोड होणार नाही. मात्र यापूर्वी या पद्धतीने Google Photos मध्ये बॅकअप झालेले फोटो आणि व्हिडिओ मात्र सुरक्षित राहतील. जुन्या बॅकअपवर या बदलाचा परिणाम होणार नाही.
फोटोचा बॅकअप कसा घ्यायचा?
Google ने यासाठी Google Photos मधूनच बॅकअप सेट करण्याचा पर्याय दिला आहे. यासाठी –
कंप्यूटरवर Google Photos उघडा आणि बॅकअपसाठी वापरत असलेल्या त्याच Google अकाउंटचा वापर करून साइन इन करा.
Google Photos मध्ये ‘+’ पर्यायावर जाऊन ‘Back up folders’ ऑप्शन निवडा.
त्यानंतर ज्या फोल्डरमधील फोटो आणि व्हिडिओंचा बॅकअप घ्यायचा आहे, ते फोल्डर सिलेक्ट करा.
ब्राउझरला परवानगी द्या (Allow किंवा Allow on every visit).
Google Drive मध्ये आधीपासून सेव्ह असलेले फोटो Google Photos मध्ये थेट इम्पोर्ट करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.
कोणत्या युजर्सवर जास्त परिणाम?
फोनमधील फोटोचा Google Photos वर बॅकअप घेणाऱ्या सामान्य युजर्सना या बदलाचा फारसा परिणाम होणार नाही. कारण Google Photos अॅपमधील मोबाइल बॅकअप सुविधा सुरूच राहणार आहे.
मात्र कंप्यूटर किंवा लॅपटॉप वर फोटो सेव्ह करणारे युजर्ससाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे . उदाहरणार्थ, कॅमेऱ्यातून फोटो कॉम्प्युटरवर ट्रान्सफर करणारे, स्कॅन केलेले फोटो सेव करणारे किंवा एखाद्या ठरावीक संगणक फोल्डरचा Google Photos बॅकअप म्हणून वापर करणाऱ्या युजर्सनी 10 ऑगस्टपूर्वी नवीन बॅकअप पद्धत सेट करणे आवश्यक होते.
10 ऑगस्टनंतर जुने Google Photos बॅकअप डिलीट होणार नाहीत; मात्र नवीन फोटो-व्हिडिओंचा स्वयंचलित बॅकअप थांबू शकतो. त्यामुळे तुमच्या कॉम्प्युटरवरील फोटो सुरक्षित ठेवायचे असतील, तर नवीन बॅकअप सेटअप आधीच करून ठेवणे योग्य ठरेल.


