वाळवा तालुक्यातील तुजारपूर येथील प्रियांका सुनील गुरव (वय 28) या विवाहितेचा पतीनेच अनैतिक संबंधाच्या संशयावरूनच गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पती सुनील तानाजी गुरव (वय 31) याला पोलिसांनी अटक केली आहे. खुनाचा हा प्रकार मंगळवारी रात्री वाघवाडी परिसरात घडला होता. बुधवारी तो उघडकीस आला होता.
बुधवारी सायंकाळी वाघवाडी येथील बांदल शिवारात प्रियांका हिचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळावर मृतदेहाची ओळख पटण्यासाठी कोणताच पुरावा नव्हता. त्यामुळे ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते. मृतदेहाच्या शेजारी असलेल्या पिशवीत इस्लामपूर पोलिस ठाण्याचे नाव व नंबर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीवरील अक्षर याच पोलिस ठाण्याचे कर्मचारी योगेश जाधव यांचे होते. त्यांनी या महिलेला हा नंबर लिहून दिला होता. त्यामुळे ही महिला तुजारपूरची असल्याचे स्पष्ट झाले.
मृतदेहाची ओळख पटल्यानंतर इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुखे, हवलदार दीपक ठोंबरे, अरुण पाटील, सचिन सुतार, आलमगीर लतीफ यांच्या पथकाने तपासाची सुत्रे हलवित सुनील गुरव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता हा खून त्यानेच केल्याची कबुली दिली.