कडेगाव नगरपंचायतीत मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरु आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून विकास कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी पाणी संघर्ष समितीचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी. एस. देशमुख व वंचित आघाडीचे जीवन करकटे यांनी कडेगाव तहसील कार्यालय इमारतीवर शोले स्टाईलने आंदोलन सुरू केले आहे.
नगरपंचायतीत भोंगळ कारभार सुरु असल्याने आज शनिवारी (दि. १८) रोजी सकाळी तहसील कार्यालय इमारतीवर आंदोलनकर्ते चढले आहेत. यावेळी आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर कडेगाव कार्यालय इमारतीवरून उडी घेवू असा पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, आंदोलकांनी इमारतीवरून उडी घेवू नये यासाठी तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु, भ्रष्ट कारभाराची चौकशीचे आदेश लेखी दिले नाही तर तहसील इमारतीवरून उडी घेणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.
आंदोलन स्थळावर लोकांनी मोठी गर्दी झाली आहे. यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली असून तातडीच्या बैठकीचे व चर्चेचे नियोजन आखण्यात येत आहे.