दुसरा घरगुती गॅस सिलिंडर मिळण्यासाठी आता २५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीचा १५ दिवसांचा कालावधी आता १० दिवसांनी वाढविण्यात आला
गॅस वितरक कंपन्यांनी व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना महिन्यातून एकच गॅस सिलिंडर देण्याबाबत केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा कालावधी वाढला असला, तरी तो कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अचानक लागू झाल्याने काही ग्राहकांचा गोंधळ उडाला.
‘एलपीजी’ गॅसचा वापर घरात स्वयंपाकासाठी केला जातो. नागरिकांना दोन सिलिंडर वापरण्याची परवानगी असते. त्यासाठी पहिला सिलिंडर वापरायला सुरुवात केल्यानंतर १५ दिवसांनी अर्ज करता येत होता. आता अचानक हा कालावधी वाढविण्यात आला आहे.
‘आखातात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला असेल, तर तसे जाहीर करावे. अशा कठीण परिस्थितीत नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. सत्यस्थिती समजल्यास नागरिकांनाही पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळेल,’ असे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले.
आतापर्यंत पहिला सिलिंडर घेतल्यानंतर १५ दिवसांनी दुसऱ्या सिलिंडरसाठी अर्ज करता येत होता. नेहमीप्रमाणे दुसरा सिलिंडर मिळावा म्हणून ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला. मात्र, दुसऱ्या सिलिंडरसाठी २५ दिवसांनी पुन्हा अर्ज करून बघा, असा संदेश मिळाला. अनेक नागरिकांना अशाच प्रकारची अडचण येत आहे. विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच
आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरबाबत सूचना दिल्या असून, त्यानुसार महिन्यातून एकच सिलिंडर देता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व गॅस वितरक केंद्रांना तसे लेखी आदेश देण्यात आले आहेत. पुरवठा सुरळीत होईल, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. ग्राहकांनी गॅस आरक्षणासाठी एकाच वेळी ऑनलाइन प्रक्रिया केल्याने यंत्रणेवर ताण येत असल्याने समस्या निर्माण होत आहे. – महेश सुधाळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी
पहिल्यांदा महिन्यातून दोन गॅस सिलिंडर देता यायचे. आता मात्र युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना महिन्यातून एकच गॅस सिलिंडर देण्याचे लेखी आदेश केंद्र सरकारकडून एजन्सींना देण्यात आले आहेत. त्यानुसार गॅसचे वितरण होणार आहे. प्रवीण खंडाळकर, – उपाध्यक्ष, ऑल इंडिया गॅस वितरक संघटना





