कोल्हापूर शहरात महापालिकेच्या वतीने डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ येऊ नये यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. त्यांतर्गत सोमवारी ठिकठिकाणी 482 कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यात 17 ठिकाणी डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी औषध टाकून अळ्या नष्ट केल्या.
महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून दैनंदिन औषध फवारणी, धूर फवारणी व डास अळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. सोमवारी शाहूमिल कॉलनी, राजारामपुरी 7 वी गल्ली, कणेरकरनगर व न्यू पॅलेस परिसर या ठिकाणी कीटकनाशक विभागाच्या पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
कोल्हापूर शहरात स्वच्छता केल्यानंतर निर्माण होणारा कचरा, गाळ, झाडांचे कटिंग, फांद्या तसेच भाजीपाला मार्केटमधील कचरा उठाव करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने 18 ट्रॅक्टरट्रॉली भाडे तत्त्वावर घेण्यात आले आहेत.
नागरिकांनी आपल्या दारातील झाडांचे कटिंग, फांद्या उठाव करण्यासाठी वॉर रूममधील 0231-2542601/2545473/ 9766532037 या नंबरवर संपर्क साधावा. त्यामुळे संबंधित ठिकाणी ट्रॉली जाऊन कचरा उठाव केला जाईल. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी झाडांचे कटिंग, फांद्या उघड्यावर टाकल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.