राज्यात सध्या सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसांडून वाहत
आहेत. काही ठिकाणी पावसामुळे बळीराजा सुखावला आहे तर काही ठिकाणी दुबारपेरणीचं संकट आहे.
अशात हवामान खात्याकडून पुन्हा एकदा राज्याला मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा (Heavy Rainfall Alert) दिला आहे. IMD कडून पुढच्या ४८ तासांसाठी संपूर्ण राज्यात मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पुढचे काही दिवस पावसाचे असून अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात मुसळधार पाऊस होऊ शकतो. आजपासून पुढचे दोन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढच्या २४ तासांमध्ये कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांनाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं तर शेतकऱ्यांनाही पिकाची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, हवामान खात्याकडून अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी तुरळक पाऊस असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खरंतर, राज्यात अहमदनगरमध्ये शिर्डी, नाशिक आणि सातार जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे नदी नाले तुडूंब भरले असून शेतकऱ्यांच्या शेतामध्येही पाणी शिरलं आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचीही दाणादाण उडाली आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.