इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे गुरुवारी ३० जुनला संपूर्ण राज्यातील लाखो भाविकभक्तांचे लक्ष लागून असलेले जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री.तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले.
नेत्रदीपक रिंगण सोहळा डोळ्यात साठवून घेण्यासाठी जमलेले हजारो भाविक सणसर (ता.इंदापूर) येथील मुक्काम आटोपून जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांचा पालखी सोहळा बेलवाडी येथे दाखल झाला.सुरवातीला गावकऱ्यांनी सर्व वैष्णवांचे व भाविकभक्तांचे स्वागत केले.लाखो वैष्णव देहूतून निघाल्यापासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात तो क्षण म्हणजेच बेलवाडी येथील अश्वांचा गोल रिंगण सोहळा. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. “विठोबा-रखुमाई” व “ज्ञानोबा-तुकारामाच्या” जयघोषाने संपूर्ण आसमंत दुमदुमत होता.
टाळ-मृदुंगाचा गजर व मुखी अभंगाची वाणी घेऊन गेल्या दहा दिवसांपासून पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी निघालेल्या वैष्णवांना देवाच्या अश्वांचे पहिले गोल रिंगण पाहण्याची ओढ लागली होती. सुरवातीला नगराखान्याने प्रदक्षिणा घातलीनंतर बेलवाडी येथील मचाले कुटुंबाच्या मेंढ्यांनी प्रदक्षिणा घातली. तद्नंतर अनुक्रमे झेंडेकरी,हंडा तुळशी,पखवाजे,टाळकरी,विणेकरी यांनी भक्तिमय वातावरणात प्रदक्षिणा घातल्या. सरतेशेवटी सुरू झाला सर्वांचे लक्ष लागून राहिलेला अश्वांचा रिंगण सोहळा! अश्वांचे पूजन झालेआणि लाखो भाविकांचे डोळे अश्वांच्या शर्यतीचा तो विलक्षण क्षण टिपण्यासाठी सज्ज झाले.