राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात होती. नुकताच तिला जामीन मिळाला. 22 जूनला केतकी चितळेची ठाण्याच्या तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर केतकी चितळेने गंभीर आरोप केले आहेत. केतकी चितळेने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, पोलिस कोठडीत (Police Custody) असताना आपला विनयभंग (molested) झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
केतकी चितळेने या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘बेकायदेशीरपणे मला माझ्या घरातून अटक करण्यात आली होती. कोणतीही नोटीस, अटक वॉरंट नसताना मला जेलमध्ये टाकण्यात आले होते. मी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नव्हते. जे सत्य आहे ते मी बोलले होते त्यामुळे मी त्याचा सामना करु शकत होते.’ तसंच, ‘मला मारहाण झाली, विनयभंग झाला. पोलीस कोठडीत असताना माझ्यावर शाईच्या नावाखाली विषारी काळा रंग टाकण्यात आला होता.’, असा आरोप केतकीने केला आहे.
फेसबुकवर केलेल्या आपल्या वादग्रस्त पोस्टसंबंधी बोलताना केतकीने सांगितलं की, ‘त्या पोस्टमध्ये फक्त पवार असा उल्लेख होता. लोकांनीच ते शरद पवारांसंबंधी आहे असा अर्थ लावला. पोस्टमध्ये मी कोणाचाही अपमान केला नव्हता. लोकच शरद पवार तसे आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत का? माझ्याविरोधात तक्रार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आणि इतर लोकांना मला हे विचारायचं आहे’, असे म्हणत केतकीने तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलेल्यांना सवाल केला आहे.




