जिल्ह्यातील जवळपास 1850 व राज्यातील 47 हजारपेक्षा जास्त होमगार्डना (homeguard) विम्याचे संरक्षण मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व होमगार्डचे एचडीएफसी बँकेत खाते उघडण्याचे काम सुरू असून जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व होमगार्डचे बँक खाते सुरू होणार असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. विविध सण, उत्सव कायदा व सुव्यवस्था तसेच संकटाच्या काळामध्ये पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड (homeguard) आपले कर्तव्य बजावत असतात. शहरासह ग्रामीण भागातील अनेक होमगार्ड पोलिसांना मदत करत असतात. याबाबत काही अघटित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांप्रमाणेच होमगार्डनाही सुरक्षा मिळाव्यात, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती.
होमगार्डना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी बँकांशी संपर्क साधून प्रयत्न केले असता एचडीएफसी बँकेने होमगार्ड स्वयंसेवकांना तसेच वेतन कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुविधा देण्याचे मान्य केले. पोलिस महासंचालक तथा महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या पाठपुराव्याला यश आले. ऑगस्ट 2022 पासून जिल्ह्यातील सर्व होमगार्डना सोयी सुविधा मिळणार आहेत.