Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंगमहाबळेश्वर ठप्प; पावसामुळे दरड कोसळली

महाबळेश्वर ठप्प; पावसामुळे दरड कोसळली

महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असून सोमवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत 22 इंच पावसाची नोंद झाली तर दिवसभरही पावसाची संततधार सुरूच होती. या पावसाने कोट्रोशी पूल ते रेनोशी रस्त्यावर दरड कोसळली.

महाबळेश्वर शहर व तालुक्यात जून महिन्यापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत होता. पण, त्यात सातत्य नव्हते. जुलै महिन्याच्या प्रारंभापासूनच पावसाने आता जोर धरला आहे. तमाम महाबळेश्वर – पाचगणीकरांची तहान भागवणाऱ्या वेण्णा तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या जोरदार पावसाने पश्चिम भागातील कोट्रोशी पूल ते रेनोशी या मुख्य रस्त्यावर दरड कोसळली. दरड कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. महाबळेश्वर एसटी आगाराची दाभे मुक्कामी असलेली एसटी ही महाबळेश्वरकडे येत असताना या दरडीच्या ठिकाणी अडकली.

दरम्यान दरड कोसळल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांना समजताच त्यांनी तातडीने जेसीबीच्या सहाय्याने एक तासाच्या प्रयत्नाने दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. महाबळेश्वर या निसर्गरम्य पर्यटनस्थळी शनिवार, रविवार या विकेंडला पर्यटकांची चांगलीच रेलचेल होती. सध्या येथे वर्षा पर्यटनास सुरुवात झाली आहे. सर्वत्र दाट धुके सोबतच पाऊस या वातावरणाचा पर्यटक आनंद घेताना दिसून येत आहेत. रेनकोट, छत्री घेवूनही काही पर्यटक सेल्फी घेताना दिसत आहेत.

डोंगरी-घाट भागात सावधानतेचा इशारा

आपत्ती व्यवस्थापन कक्ष तहसिलदार कार्यालय महाबळेश्वर यांना आपत्ती व्यवस्थापन कक्ष मंत्रालय मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 5, 6 , 7, 8 जुलै या कालावधीत सातारा जिल्ह्याच्या घाट, डोंगर भागामध्ये तीव्र स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता असून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात सर्व नागरिक, शेतकरी वर्ग, शाळकरी विद्यार्थी -पालक, सर्व वाहनचालक आदींनी या काळात सतर्क रहावे, असे आवाहन तहसिलदार सुषमा चौधरी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -