कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) गेल्या तीन वर्षात पावसामुळे अपघातच्या अनेक घटना घडल्या आहेत. यंदा पावसाळा सुरू होऊन देखील महिनाभर पाऊस नसल्याने जिल्ह्यातील धबधबे (kolhapur district waterfall) सुरू झाले नव्हते. मात्र नंतर पावसाने हजेरी लावत गेल्या दोन दिवसांपासून धबधबे सुरू झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील (kolhapur district heavy rainfall shahuwadi tehsil) बर्की धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जवळपास 80 पर्यटक (80 people trapped in waterfall) गेले होते. याचवेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक नद्या आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील ओढ्यावर जोरदार पाणी आल्याने प्रवासी अडकून पडल्याची घटना घडली. दरम्यान ग्रामस्थांच्या प्रसंगावधानाने सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने अनर्थ टळला.
कोल्हापूर (Kolhapur City) येथून 2 मिनीबस व 8 कारने अंदाजे 70- 80 पर्यटक शाहूवाडी तालुक्यातील (Shahuwadi Tahsil) बर्की धबधबा (Barki Waterfall) पाहण्यासाठी काल दुपारी गेले होते. सायंकाळी 5 वाजता परतीचा प्रवास करत असताना बर्की गावाजवळील ताफेरा ओढा तसेच कासारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने सर्व प्रवासी अडकले होते. ही बाब लक्षात येताच बर्की येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सोबत वनरक्षक होते. या ठिकाणची पाणी पातळी ओसरल्यावर सर्व वाहने व प्रवासी यांना सुखरुप काढण्यात आले. दरम्यान, अतिवृष्टी होत असताना पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व धबधब्यांच्या ठिकाणी सहलीला जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
दोन धबधबा पर्यटकांसाठी बंद
सध्या राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवनवर परिणाम झाला आहे. हवामान खात्याने पुढेही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. अशात कोल्हापूर जिल्ह्यातील बर्की, सोनुर्ले धबधब्यासह परिसरातील नदी, नाल्यांची पाणी पातळीत वेगाने वाढत आहे. ही बाब लक्षात घेता काही दिवस पर्यटकांसाठी बर्की, सोनुर्ले हे दोन धबधबे बंद करण्याचा निर्णय वन विभागाने घेतल्याचे आरएफओ रवींद्र सूर्यवंशी, वनरक्षक संजय पाटील यांनी सांगितले.