कोरोनाचा संसर्ग (Covid 19) आटोक्यात आला असताना देशातील कोरोनाची प्रकरणे पुन्हा एकदा वाढत आहे. महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली (Delhi), कर्नाटकसह (Karnataka) अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे देशात चौथ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत असून केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandviya) सातत्याने कोरोनाच्या प्रकरणांचा आढावा घेत आहेत. अशातच देशात कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट समोर आला आहे. कोविडचा हा नवीन प्रकार BA.2.75 आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे.
याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या दोन आठवड्यात जागतिक स्तरावर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. डब्ल्यूएचओच्या सहा उप-प्रदेशांपैकी चारमध्ये गेल्या आठवड्यात प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. युरोप आणि अमेरिकेत BA.4 आणि BA.5 ची प्रकरणे आहेत. त्याच वेळी, भारतासारख्या देशांमध्ये BA.2.75 चे नवीन सब व्हेरिएंट देखील आढळून आले आहे. त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.
19 हजार नवीन रुग्णाची भर
गुरुवारी देशात कोरोनाचे सुमारे 19 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 18,930 नवीन रुग्ण आढळले असून यादरम्यान 35 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 14,650 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,19,457 पर्यंत वाढली आहे आणि दैनिक पॉझिटिव्हिटी दर 4.32% आहे.
देशातील एकूण संक्रमितांची संख्या 4,35,66,739 वर पोहोचली आहे आणि आतापर्यंत 5,25,305 लोकांनी आपला जीव गमावला आहे आणि 4,29,21,977 लोकांनी या आजारावर मात केली आहे.
लसीकरण मोहीमला वेग
गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी देशात लसीकरण मोहीम सुरू झाली होती. कोविड-19 लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार लसीकरणमोहिमेअंतर्गत मोफत कोविड-19 लस उपलब्ध करून देत आहे. त्यातच नुकतेच एका नवीन लासला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार सरकार सर्वांना लस देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.