विश्रामबाग येथील सुनीता अरूण पाटील (वय 55) यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने ‘धूमस्टाईलने’ लंपास केले. विश्रामबाग येथे शंभरफुटी रस्त्यावर बुधवारी सकाळी भरपावसात ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनीता पाटील विश्रामबाग येथे श्री कॉम्पलेक्समध्ये राहतात. त्या दररोज सकाळी फिरायला जातात. पावसामुळे त्या बुधवारी उशिरा गेल्या. फिरून त्या घरी परतत होत्या. त्यावेळी पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवरून एकजण आला. त्याने पाटील यांच्या गळ्यातील सोन्याचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसडा मारून लंपास केले. त्याची किंमत सत्तर हजार रुपये आहे.
अवघ्या काही सेकंदात हा प्रकार घडल्याने पाटील घाबरून गेल्या. चोरट्याने जोराचा हिसडा दिल्याने त्या रस्त्यावर पडल्याही. परिसरातील काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला. चोरटा थेट सांगलीच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेला. नागरिकांनी त्याचा पाठलागही केला. पण तो सापडला नाही. विश्रामबाग पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळ ते संपूर्ण शंभरफुटी रस्त्यावर असणारे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पांढऱ्या रंगाची मोपेड गेलेली फुटेज दिसते. पण चोरट्याचा चेहरा स्पष्टपणे दिसून येत नाही. पाटील यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटा हा 25 ते 30 वयोगटातील होता. हिसडा मारून दागिने लंपास करण्यासाठी पहिल्यांदाच मोपेड गाडीचा वापर झाला आहे.