ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; शनिवारी पावसाचा जोर पुन्हा वाढला. पहाटेपासून सुरू झालेली पावसाची संततधार दिवसभर कायम होती. त्यामुळे पात्राकडे चाललेली पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर पडली आहे. दिवसभरात पाणी पातळीत एका फुटाने वाढ झाली. रात्री उशिरा पंचगंगेची पातळी 32 फुटांवर गेली. जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत अतिवृष्टी सुरू आहे. 34 बंधाऱ्यांवर पाणी असल्याने त्यावरील वाहतूक बंदच आहे.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या सर्वच भागांत शनिवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. जोर वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी दोन दिवसांपासून कमी होत होती. शनिवारी पहाटे तीन वाजता पाणी पातळी 30 फूट 7 इंचांपर्यंत कमी झाली. पंचगंगेचे पाणी पात्रापासून काही अंतरावरच होते. यामुळे शनिवारी दुपारपर्यंत पंचगंगेचे पाणी पात्रात जाईल, अशी शक्यता होती. मात्र, पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने सकाळी आठनंतर पंचगंगेच्या पातळीत पुन्हा वाढ सुरू झाली. सकाळी 11 वाजता पाणी पातळी 30 फूट 11 इंचांपर्यंत गेली. रात्री आठ वाजता ही पातळी 31 फूट 6 इंचांपर्यंत गेली.