पूर्व नियोजित आणि शांत डोक्याने मांत्रिक आब्बास बागवान याने वनमोरे कुटुंबीयाचा काटा काढला आहे. त्यानंतर गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी आणलेली भांडी सोलापुरातील एका दुकानात विकली आहेत. त्या दुकानदाराची, विषप्रयोगासाठी वापरण्यात आलेल्या त्या 9 बाटल्या विक्रेत्याची आणि बनावट नंबर प्लेट बनविणाऱ्याची पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला असून याबाबत पोलिसांनी गोपनियता पाळली आहे.
गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचा संशय येऊ नये, आलाच तर दिशाभूल व्हावी, यासाठी मांत्रिक बागवान याने त्याच्या कारची नंबरप्लेट बदलून चुकीची नंबरप्लेट वापरली होती, असे त्याने तपासात सांगितले होते. तसेच त्याने विषारी द्रव देण्यासाठी ज्या 9 बाटल्या वापरल्या होत्या, त्या देखील त्याने सोलापुरातून आणल्याचे तर, गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी आणलेली भांडी सोलापुरात विकली असल्याचे तपासात उघकीस आले होते.
या सर्व गोष्टींची शहानिशा करण्यासाठी पोलिसांचे एक पथक सोलापूर येथे गेले होते. या पथकाच्या तपासात मांत्रिक बागवान याने गुप्तधन शोधण्यासाठी काही विशिष्ट प्रकारची भांडी वनमोरे यांच्या घरी आणून हत्येपूर्वी ठेवल्याचे उघडकीस आले होते. तसेच वनमोरे कुटुंबाचे हत्याकांड करण्यासाठी येत असताना बागवान याने सोलापुरातील एका दुकानातील 9 बाटल्या खरेदी केल्या होत्या. त्याच बाटल्यांमधून सर्वांना विषारी गोळ्याचे द्रव्य पिण्यास दिले होते.
दि. 20 जून रोजी वनमोरे यांच्या संपूर्ण कुटुंबाचा काटा काढण्याल्यानंतर गुप्तधन शोधण्यासाठी आणलेली सर्व भांडी गोळा करून त्याने आणलेल्या कारमध्ये ठेवली. त्यानंतर त्याने थेट सोलापूर गाठले होते. सोलापुरातील एका भांड्याच्या दुकानात ती विकल्याची या पथकाला माहिती मिळाली.
मांत्रिक बागवान याने दिलेला जबाब आणि सोलापुरातील त्या दोघांकडून मिळालेल्या माहिती याद्वारे पोलिस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, मांत्रिकाच्या बहिणीच्या बँक खात्याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच मांत्रिक बागवान याचे हत्याकांडा व्यतिरिक्त आणखीन काही कारनामे केले आहेत का, याचा तपास करण्यात येत आहे. परंतु मांत्रिक बागवान हा तपासात सहकार्य करीत नसल्याने विविध उपायांचा वापर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
भांडी दुकानातील सीसीटीव्हीत कारनामे चित्रित
गुप्तधनासाठी आणलेली भांडी विक्रीसाठी मांत्रिक बागवान याची कार सोलापुरातील त्या दुकानाबाहेर जावून थांबली. त्यानंतर मांत्रिक कारमधून उतरून त्या दुकानात गेल्याचे चित्रीकरण झाले आहे. मांत्रिक बागवान याने त्याच दुकानात भांडी विकल्याचा पोलिसांचा संशय असून पोलिसांनी दुकानदाराचा जबाब नोंदविला आहे. बागवानच्या सर्व हालचाली त्या दुकानातील सीसीटीव्हीत चित्रित झालल्या असून मांत्रिक बागवान याच्या विरुद्धचा हा महत्वाचा पुरावा असल्याचे सांगण्यात आले.