राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्रीवर बोलाविलेल्या बैठकीला कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक उपस्थित नसल्याची ब्रेकिंग न्यूज झळकली. मात्र काही क्षणातच मंडलिक यांनी आपण लोकसभेच्या काही समित्यांच्या बैठकीसाठी नेत्यांना पूर्वकल्पना देऊन दिल्लीत आल्याचे सांगितले. ‘मंडलिक रिचेबल की नॉटरिचेबल’ या चर्चेवर पडदा पडला.
काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवरील बैठकीला किती खासदार उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. बैठकीची वेळ झाली तरी मंडलिक मातोश्रीवर न पोहोचल्याने ते ‘नॉट रिचेबल’ झाल्याची चर्चा सुरू झाली.
त्या पार्श्वभूमीवर मंडलिक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रविवारी कोल्हापुरात आपण दिल्लीला जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. तशी पूर्वकल्पनाही नेत्यांना दिली होती. लोकसभेच्या कामगार व पिटिशन कमिटीच्या बैठका असल्याने आपण दिल्लीला आल्याचे त्यांनी सांगितले.