ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : संततधार पावसाने पंचगंगा नदी इशारा पातळीकडे जात आहे. मंगळवारी पाणी पातळी 34 फुटांवर गेली. बारा नद्यांवरील एकूण 53 बंधारे पाण्याखाली गेले असून, त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. सकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. त्यानंतर सूर्यदर्शनासह पावसाने काही काळ उघडीप दिली. सायंकाळी पंचगंगेचे पाणी शिवाजी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ आले. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. धामणी नदीवरील आंबर्डे बंधाऱ्यावर तसेच कुंभी नदीवरील गोठे पुलावर पाणी आल्याने धामणी खोऱ्यातील आठ गावांचा संपर्क तुटला आहे. टेकवाडीला (ता. गगनबावडा) पुराचा वेढा पडला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी रेड अलर्ट दिला होता. सकाळपासूनच धुवाँधार पाऊस सुरू होता. दुपारी बारानंतर पावसाने उसंत घेतली. गेल्या चारपाच दिवसांनंतर प्रथमच काही काळ सूर्यदर्शन झाले. पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. पावसाचा जोर पुन्हा काहीसा कमी झाला. त्यानंतर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बसरत होत्या. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतच आहे.