कासारवाडी: जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील रेखा शिवाजी मोहिते (वय ६०) यांचे वारणा नदीच्या पुराचे पाणी घरात शिरेल, या धास्तीने मृत्यू झाला. त्या जनावरांसाठी ओला चारा साठवणूक करून ठेवण्यासाठी शेतात गेलेल्या असताना त्या चक्कर येऊन पडल्या. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पुराच्या धास्तीने शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वारणा नदीच्या काठावर जुने पारगाव गाव आहे.
येथील पोलीस पाटील गल्ली आणि परिसरात दरवर्षी वारणा नदीच्या पुराचे पाणी येते. घरात पुराचे पाणी येत असल्यामुळे येथील ग्रामस्थांना जनावरांसह स्थलांतरीत व्हावं लागते. मागील वर्षी अचानक पाण्यात वाढ झाल्याने एका रात्रीत लोकांना स्थलांतर व्हावे लागले होते. या वर्षीही काही दिवसांपासून वारणा नदी पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.






