आजवर आपल्या खिशापासून थेट दारापर्यंत पोहोचलेली महागाई आता आपल्या घरात प्रवेश करणार आहे. कारण येत्या 18 जुलैपासून तुमच्या घराचा घरगुती खर्च वाढणार आहे. नुकत्याच झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या (GST Council) 47 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 18 जुलैपासून अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. यामध्ये पनीर, लस्सी, बटर मिल्क, पॅकेज केलेले दही, गव्हाचे पीठ, कडधान्ये, मध, पापड, तृणधान्ये, मांस आणि मासे अशा वस्तूंचा समावेश आहे. तर प्री-पॅकेज केलेल्या लेबलांसह कृषी मालाच्या किंमतीही 18 जुलैपासून वाढणार आहेत. या दरवाढीमुळे आता सर्वसामान्य जनतेची चांगलीच हेळसांड होणार आहे.
वरील वस्तूंच्या किमती वाढणार असल्या तरी काही वस्तू स्वस्त देखील होणार आहेत. यामध्ये रोपवेवरून प्रवासी आणि वस्तूंची ने-आण करणे तसेच स्प्लिंट्स आणि इतर फ्रॅक्चर उपकरणे, बॉडी प्रोस्थेसेस, बॉडी इम्प्लांट्स, इंट्रा-ऑक्युलर लेन्स इत्यादीं वस्तूच्या किमती कमी होणार आहे.
दरम्यान, 18 जुलैपासून वाढणाऱ्या या नव्या दराचा फटका संपूर्ण भारतीयांना सोसावा लागणार आहे. दिवसेंदिवस वाढत्या जीएसटीच्या दरामुळे जीएसटी संबंधी सर्वसामान्यांच्या मनात काही प्रश्न निर्माण होत आहेत.