राज्यात सलग पाचव्या दिवशी पावसाची जोरदार (Heavy Rain in Maharashtra) बॅटिंग सुरूच आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 99 जणांचा बळी घेतला आहे. तर 181 जनावरे दगावली आहेत. शुक्रवारी मुंबई (Mumbai Rain), पुणे (Pune Rain), रायगड (Raigad Rain), पालघर (Palghar Rain) सातारा (Satara) आणि कोल्हापुरात (Kolhapur Rain) जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाने (IMD) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा, विनाकारण घराबाहेर निघू नका, अशा सुचना जिल्हाप्रशासनाने दिल्या आहेत. पुण्यातील खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने गुरुवारी विसर्ग वाढवला होता.
राज्यातच नव्हे तर देशातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात मुंबई, रायगड, पुणे, कोल्हापूर, नाशिक भागात पावसाचा जोर कायम आहे. काही जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती आहे. विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच काही जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील पर्यटनस्थळांवर कलम 144 लागू करण्यात आला असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. आदेशानुसार, रविवारी 17 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत पर्यटक,गिर्यारोहक आणि ट्रेकर्स यांना पर्यटनस्थळावर प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील तीन दिवस शाळांनाही सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.