ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; राज्यातील सरकार बदलाच्या घडामोडीनंतर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आरोपप्रत्यारोप आणि राजकीय गोंधळाने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. नेते नॉट रिचेबल होताच कार्यकर्त्यांचा जीव वर-खाली होतो आणि त्यांची अवस्था ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी होते. गेले काही दिवस याच वातावरणात कार्यकर्ते वावरत आहेत.
महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तारूढ होताच जिल्ह्यातून शिवसेनेतील कोण-कोण शिंदे गटात जाणार, याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रकाश आबिटकर शिंदे गटात पहिल्याच फेरीत दाखल झाले. त्यापाठोपाठ स्वतंत्र निवडून आलेले व शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले राजेंद्र पाटील-यड्रावकर हेही शिंदे गटात गेले आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.
नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी काढलेल्या जीआरमधील त्रुटी दूर करून सर्व पात्र शेतकऱ्यांना हा लाभ द्यावा, अशी मागणी घेऊन खा. धैर्यशील माने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. शिंदे यांनीही या निर्णयाची घोषणा करताना त्यांच्या नावाचा उल्लेख केला. तेव्हापासून ‘माने नेमके कोणाचे’ या चर्चेला वेग आला आहे.