ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : पंधरा दिवसांनंतर मंगळवारी रात्री पंचगंगा पुन्हा पात्रात गेली. दिवसभरात चार फुटांनी पंचगंगेच्या पाणीपातळीत घट झाली. आणखी नऊ बंधाऱ्यांवरील पाणी
ओसरल्याने त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. पंचगंगेचा पूर ओसरल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगलीच उसंत घेतली आहे. अधूनमधून कोसळणारी सर वगळता मंगळवारीही पावसाची उघडीप होती. पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजता 34 फुटांवर असलेली पंचगंगेची पाणीपातळी रात्री नऊ वाजता 29.9 फुटांपर्यंत खाली आली.
पंचगंगेचा पूर झपाट्याने ओसरला. यामुळे रात्री आठच्या सुमारास पंचगंगा पुन्हा पात्रात गेली. 5 जुलै रोजी पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले होते. यानंतर मंगळवारी 15 दिवसांनी पंचगंगेचे पाणी पात्रात गेले. टप्प्याटप्प्याने पडलेल्या पावसाने आणि धरणांतील विसर्गाच्या नियोजनाने मोठा दिलासा मिळाला. पंचगंगेने इशारा पातळी गाठली नाही. यामुळे महापुराचा धोका तूर्त टळला. पंचगंगेचे पाणी पात्रात गेल्याने घाटावर वाहून आलेल्या गाळाचे साम–ज्य होते.