जिल्ह्यात बुधवारी आणखी 16 बंधाऱ्यांवरील पाणी ओसरले. त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. आता केवळ 15 बंधाऱ्यांवर पाणी आहे. दोन दिवसांत हे बंधारेही खुले होतील, अशी शक्यता आहे. पंचगंगेच्या पातळीतही घट होत असून बुधवारी सायंकाळी पाणी पातळी 24 फुटांपर्यंत खाली आली. राधानगरी धरणाचा पाणीसाठा स्थिर ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यात बुधवारीही पावसाचा जोर फारसा नव्हता. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी केवळ 4.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात झालेला 21.2 मि.मी. हा दिवसभरातील सर्वाधिक पाऊस ठरला. पावसाने पूर्ण उसंत दिल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने घट सुरू आहे. आज दिवसभरात 16 बंधारे खुले झाले, तर 15 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यात पावसाने झालेल्या नुकसानीची रक्कम 1 कोटी 3 लाख 19 हजारांवर गेली आहे. आजअखेर जिल्ह्यात पावसाने 5 मोठी, तर दोन लहान दुधाळ जनावरे मृत झाली आहेत. तीन घरे पूर्ण पडली. 117 पक्की घरे, तर 201 कच्ची घरे अशंतः पडली आहेत. जनावरांचे 37 गोठेही बाधित झाले आहेत. आठ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे.