साधा खोकला झाला, की डाॅक्टरांकडे न जाता बरेच जण मेडिकल दुकानातून थेट ‘कफ सिरफ’ औषध घेतात.. मात्र, गेल्या काही दिवसांत या औषधाचा वापर खोकल्यावर कमी नि नशेसाठीच केला जात असल्याचे समोर आले होते.. अनेक खासदारांनी याबाबत चिंता व्यक्त करताना, थेट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे तक्रार केली होती..
आरोग्यमंत्री मांडविया यांनी गेल्या मार्चमध्ये ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ला (डीसीजीआय) याबाबत आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना करण्यास सांगितलं होतं. ‘डीसीजीआय’ने नुकताच याबाबतचा अहवाल आरोग्य मंत्रालयाला दिला आहे. त्यानुसार, मोदी सरकार लवकरच ‘कोडिन’ आधारित ‘कफ सिरप’ची निर्मिती व विक्रीवर बंदी घालू शकते.
अफूपासून बनतंय कोडीन
‘कोडीन’ हे अफूपासून बनविलेले एक वेदनाशामक आहे. सामान्यतः खोकला, वेदना व अतिसारावरील उपचारांसाठी त्याचा वापर केला जातो.. उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल व कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये या औषधाचा सर्वाधिक वापर केला जात असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
खरं तर 2015 पासून कोडीनयुक्त ‘कफ सिरप’वर बंदी घालण्याची मागणी होत होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत होते.. 2017 मध्ये ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने (NCB) ‘डीसीजीआय’ला कफ सिरफमधील कोडीनची मात्रा कमी करण्यास सांगितले होते. या औषधाचा नशा म्हणून गैरवापर होत असल्याचे ‘एनसीबी’ने म्हटलं होतं.
‘कोडीन’वर आधारित औषधांवर बंदी घालण्याची मागणी व ‘एनसीबी’च्या हस्तक्षेपानंतर अनेक औषध उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या लोकप्रिय ‘सिरप’मध्ये ‘कोडिन’चे प्रमाण बदलले. अनेक कंपन्यांनी त्यांच्या ‘कफ सिरप’मधून ‘कोडीन’ काढून टाकलं.
कफ सिरपमध्ये सुरुवातीच्या काळात अफू, हेरॉईन, क्लोरोफॉर्म व मॉर्फिनचा वापर केला जात होता. मात्र, नंतर त्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर ‘संश्लेषण’ किंवा ‘सिंथेसिस’ केलेले पदार्थ कफ सिरपमध्ये वापरले जाऊ लागले. मात्र, तरीही सर्दी, खोकला, श्लेष्मासारख्या आजारावर वापरले जाणारे ‘कफ सिरप’ हानीकारक ठरु शकते..
15 मार्च रोजी राज्यसभेत काही खासदारांनी सांगितले, की बाजारातील ‘कोरेक्स सिरप’ हे अमली पदार्थांच्या व्यसनासाठी महत्त्वाचं उत्पादन बनलंय. ‘कोरेक्स’ हे कफ सिरप असलं, तरी त्याचा वापर उपचारापेक्षा नशेसाठी जास्त होतो. तरुणांमध्ये त्याचा वापर झपाट्यानं वाढत असल्याचंही खासदारांनी म्हटलं होतं.