शहरातील दाटीवाटीच्या संभाजीनगर परिसरात बुधवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला.
चार बंद घरांना लक्ष करत येथील सोने-चांदीचा ऐवज, एलईडी टीव्ही असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे.
बाचणीत पहाटे वृद्धेच्या गळ्यातील साडेचार तोळ्यांचे चिताक चोरट्याने हिसडा मारुन पळवले. या घटनांनी रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
संभाजीनगर परिसरातील ओम गणेश कॉलनीत नवनीत आनंदराव काशीद कुटूंबियांसोबत राहण्यास आहेत. दोन मजली आरसीसी घर असून रात्री जेवण करुन सर्वजण वरच्या मजल्यावर झोपले होते.
पहाटे साडेतीनच्या सुमारास चोरट्यांनी तळमजल्यावरील हॉलचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
शोकेसमधील साहित्य विस्कटले तसेच बेडरुममधील तिजोरी उचकटून एक तोळे वजनाच्या अंगठ्या, अर्धा तोळ्यांची सोनसाखळी, लहान मुलांच्या अंगठ्या, चांदीचे निरंजन, समई व रोख ५ हजार असा सुमारे लाखांचा ऐवज लंपास केला.
कोल्हापूर शहरात चोरट्यांचा सुळसुळाट : बंद घरांना केले लक्ष्य
ओम गणेश कॉलनीतील नामदेव खटावकर यांचेही घर चोरट्यांनी लक्ष्य केले. या घरात कोणीही राहण्यास नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. या कॉलनीपासून काही अंतरावर असणार्या स्वाती रेसिडेन्सीमधील बंद रो बंगला चोरट्यांनी फोडला.
सचिन सुभाष नरुले (सध्या रा. पुणे) यांचा हा बंगला आहे. ते कामानिमित्त पुण्यात राहण्यास असून आठवड्यातून एकदा कोल्हापुरात येत असतात.
येथील एलईडी टीव्ही व चांदीचा करंडा चोरीस गेल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
तसेच शिवराई कॉलनीतील रावसाहेब आण्णासो पाटील हे देखील पुण्यामध्ये मुलाकडे राहण्यास असून त्यांच्या घराचे कुलूप तोडून टीव्ही चोरुन नेण्यात आला आहे.
श्वान परिसरात घुटमळले
सकाळी चोरीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. यानंतर ठसे तज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
ओम गणेश कॉलनीतून गजानन महाराज नगरपर्यंत श्वानाने मार्ग काढल्यानंतर श्वान तिथेच घुटमळले.
तीन संशयित सीसीटीव्हीत कैद
गजानन महाराज नगरातील महिला वसतिगृह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात संशयितांचे फुटेज पोलिसांना मिळाले आहे.
तीन संशयित चोरटे या परिसरात पहाटे फिरताना दिसत आहेत
एक जण दुचाकी ढकलत घेवून जातानाही फुटेजमध्ये कैद झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.