Friday, March 27, 2026
Homeकोल्हापूरहोळीच्या जल्लोषातून दारू पिऊन तरुणाचा लोखंडी पाइपने केला खून; कागल पंचतारांकित एमआयडीसीतील...

होळीच्या जल्लोषातून दारू पिऊन तरुणाचा लोखंडी पाइपने केला खून; कागल पंचतारांकित एमआयडीसीतील घटना; दोघांविरोधात गुन्हा दाखल

कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात होळीच्या दिवशी परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाचा लोखंडी पाइपने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली.

 

उमेश कुमार बसंती कुमार (वय ३०, मूळ रा. नेवरिया, ता. इकौना, जि. श्रावस्ती, उत्तर प्रदेश; सध्या रा. फाइव्ह स्टार एमआयडीसी, कागल) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सत्यकुमार श्रीराजराम कुमार (मूळ रा. सैय्या, ता. भेटी, जि. आंबेडकरनगर, उत्तर प्रदेश; सध्या रा. तळंदगे, ता. हातकणंगले) यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलमणी उर्फ निलेश विनोद कुशवाहा (वय २४, रा. कुशीनगर, उत्तर प्रदेश) व अजय राजेंद्र कुशवाहा (वय २५, रा. कुशीनगर, उत्तर प्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. ४) रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास फाइव्ह स्टार एमआयडीसी, कागल परिसरात ही घटना घडली. फिर्यादी सत्यकुमार व त्यांचा मित्र उमेश कुमार हे कामावरून जात असताना आरोपींशी त्यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.

 

यावेळी निलमणी कुशवाहा याने लोखंडी पाइपने उमेश कुमार यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या मारहाणीत उमेश कुमार गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलविण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

दरम्यान, होळीचा सण असल्यामुळे औद्योगिक वसाहतीत परप्रांतीय कामगारांकडून मोठ्या उत्साहात सण साजरा केला जात होता. अनेक ठिकाणी तरुणांकडून मद्यधुंद अवस्थेत जल्लोष सुरू होता. त्यामुळे काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रकारही घडले. औद्योगिक वसाहतीत अवैध मद्यविक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने नशेतून हा प्रकार घडला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक टी. जे. मगदूम करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -