ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली : लाचप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून चिंताग्रस्त असलेले मिरजेतील सुभाषनगर येथील निवृत्त पोलिस हवालदार अशोक नामदेव कांबळे (वय 64) यांनी कृष्णा नदीत उडी घेतली. अंकली (ता. मिरज) येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.
घटनेची सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अंकलीच्या पुलावरून कांबळे यांनी उडी मारण्यापूर्वी त्यांच्या मुलीला मोबाईलवरून व्हिडीओ कॉल केला होता. 29 सेकंदाचा हा कॉल आहे. ‘हा माझा शेवटचा कॉल, मला जगायचे नाही’, असे म्हणत त्यांनी मोबाईलसह पुलावरून थेट उडी घेतली.
कांबळे 2012 मध्ये सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नियुक्तीस होते. एका गुन्ह्यात संशयित आरोपीला मदत करण्यासाठी कांबळे यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. चर्चेअंती चार हजार घेण्याचे ठरले होते. दि. 8 जानेवारी 2012 रोजी पोलिस ठाण्याच्या आवारातच कांबळे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याचा तपास करून कांबळेविरूद्ध जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.