राज्यात मुसळधार पावसाने जून महिन्याच्या अखेरपासून जुलै महिन्यात पूर्णतः दाणादाण उडवली. येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार (Maharahstra Rain Update) पावसाची शक्यता आहे. पुढचे 3 दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Weather Update) वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांत विदर्भात (Vidarbha Rains) काही जिल्ह्यांत पूरस्थिती होती. पुणे जिल्ह्यासह मुंबई, कोकण, पूर्व विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. पण रविवारी राज्याच्या काही भागात पाऊस पडला. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याच्या भागासह नाशिक, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, पालघर आदी जिल्ह्यात तुरळक ते मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून पूरही ओसरला आहे. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने विदर्भाची चिंता वाढवली आहे. आता मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. आता आजपासून पुढील दोन दिवसांत नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्येदेखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात बहुतांश शेतीचे आता नुकसान झाले आहे. याशिवाय आधीच मुसळधार पावसामुळे खरीप हंगामात लावलेल्या पिकांचे अति प्रमाणात नुकसान झाले असताना शेतकरी भरपाईची मागणी करत आहे. आता राज्यात सर्वत्र पावसाचे वातावरण असले तरी अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन पुराचा धोका निर्माण होत आहे किंवा पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असल्याने अनेक गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढली आहे.
राज्यात एक जून पासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 जिल्हे आणि 309 गावे यांचं नुकसान होऊन काही गावांचे संपर्कसुद्धा तुटले आहेत. पुरामुळे घरांचे पूर्णतः नुकसान झाल्याने, पुराचे पाणी शिरल्याने लोकांचे स्थलांतर करून 83 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत 14 हजार 480 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पावसामुळे जनावरांचेही मोठ्या प्रमाणावर हाल झालेत. अतिवृष्टीमुळे 110 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर 218 प्राणी मृत पावले आहेत. राज्यात हजारो घरांचे नुकसान झालेले आहे.