हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर कॉलनीमधील घरावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्चा धडकला. पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून खासदार धैर्यशील यांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
शिवसैनिकांकडून घराकडे जाण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या तिन्ही जिल्हाप्रमुखांना ताब्यात घेतले. यावेळी काही काळ शिवसैनिकांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुखांची बाजू समजून घेणार असल्याचे म्हटले आहे.
तब्बल 400 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी 400 मीटर अंतरावर शिवसैनिकांचा मोर्चा रोखला आहे. मात्र, शिवसैनिक अजूनही धैर्यशील मानेंच्या घराकडे जाण्यास आक्रमक आहेत. त्यामुळे संभाजी महाराज पुतळ्यानजीक शिवसैनिकही ठाण मांडून बसले आहेत. मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, विजय देवणे आणि संजय पवार करत आहेत. मोर्चाला शेकडो शिवसैनिकांनी उपस्थिती लावताना खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात रोष व्यक्त केला. गली गली मै शोर है माने चोर है अशाही घोषणाही यावेळी शिवसैनिकांनी दिल्या.