गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यातील (Maharashtra Rainfall) अनेक जिल्ह्यात पुन्हा जोर धरला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) सुरु असून याचा फटका अनेक गावांना बसला आहे. अशामध्येच हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून राज्यातील 5 जिल्ह्यांना दोन दिवसांचा अलर्ट (IMD Alert) देण्यात आला आहे. तर जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये पुढच्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्हणजे आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुढचे 24 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी खबरदारी घेत काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
तसंच, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पुढचे 48 तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान, वर्धा जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका जिल्ह्यातील अनेक गावांना बसला आहे. पावसामुळे आलेल्या पूरामध्ये जिल्ह्यातील तब्बल 84 पूल वाहून गेले आहेत. तर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आले आहेत. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तसंच, नाशिक जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक रस्ते वाहून गेले आहेत. तर, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जवळपास आठ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार पेरणीचे संकट आले आहे. याठिकाणी सरकारकडून तात्काळ पंचनामे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जावी अशी मागणी केली जात आहे.