कोल्हापूर जिल्ह्यामध्येही अग्निपथ योजनेतून सैन्य भरती होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्यात यावे, असे आवाहन प्रभारी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केलं आहे. अग्निपथ योजनेतून भरती होण्यासाठी 80 हजारांवर युवक सहभागी होण्याचा अंदाज आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान सैन्य भरती होणार आहे. या सैन्यभरतीसाठी कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच गोव्यातूनही युवक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून तयारी करण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
अग्निपथ योजनेत तरुणींनाही संधी
नव्याने घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेमध्ये तरुणींनाही संधी मिळणार आहे. अग्निवीर होण्याची तरुणींची इच्छा आता पूर्ण होणार आहे. अग्निपथ योजनेमध्ये 20 टक्के जागा तरुणींसाठी राखीव असणार आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध करण्यात येत आहे. परंतु, केंद्र सरकार अग्निपथ योजना राबवण्यावर ठाम आहे. लष्करात अग्निपथ योजनेनुसार भरती प्रक्रिया सुरूवातही झाली आहे. या योजनेमध्ये 2022 च्या पहिल्या बॅचमध्ये 20 टक्के जागा तरुणींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
अग्निवीरांसाठी ‘या’ सुविधा
अग्निवीरांना नियमित सैनिकांप्रमाणेच भत्ता मिळेल. सर्व अग्निवीरांना वर्षातून 30 दिवसांची सुट्टी मिळेल. प्रत्येक अग्निवीरला 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. याशिवाय सेवेदरम्यान वीरगती आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सुमारे एक कोटी रुपयांची मदत दिली जाईल. अग्निवीरांना कॅन्टीन सुविधा देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. यासोबतच चार वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना अनेक सरकारी सेवांमध्ये आरक्षण आणि प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही वायू दलाने सांगितलं आहे.