ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन झालं. काल, बुधवारी ( 3 ऑगस्ट) रात्री त्यांनी लखनौ शहरात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून मिथिलेश चतुर्वेदी हे हृदयविकाराचा सामना करत होते. अशातच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिथिलेश चतुर्वेदी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून लखनौ येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नंतर त्यांना घरी हलवण्यात आलं होतं. मात्र, बुधवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. मिथिलेश चतुर्वेदी यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे वृत्त दिले. ‘तुम्ही जगातले सर्वात सुंदर वडील होतात, तुमचा जावई असूनही मला तुम्ही मुलासारखं प्रेम दिलं, देव तुमच्या आत्म्याला शांती देवो’, असं आशिष यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.