बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण नुकताच साजरा झाला. या सणानंतर दुसऱ्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात एक भयंकर घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून सख्या भावानेच बहिणीसह तिच्या प्रियकराचा खून केला. (police report) भावानेच आपल्या बहिणीचा गळा आवळून, तर तिच्या प्रियकरावर गोळी झाडून दोघांची हत्या केली. या घटनेमुळे अवघे समाजमन सुन्न झाले आहे.
तरुणीचा १७ वर्षीय अल्पवयीन भाऊ स्वतः पिस्तुलासह पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री ११ वाजेच्या सुमारास एक मुलगा पिस्टल घेऊन स्वतः पोलिसात हजर झाला आणि आपण आपण दोघांना मारून आलो असे पोलिसांना स्वतः सांगितले. यामुळे (police report) पोलिसही चक्रावून गेले.
यानंतर पोलिसांनी चोपडालगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता, नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमध्ये वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. सुंदरगढी,चोपडा), राकेश संजय राजपूत (वय २२, रा. रामपुरा चोपडा) अशी या दोघांची नाव आहेत. यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले. या घटनेत रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. राकेश याचे वर्षावर प्रेम होते. हे दोघे शुक्रवारी रात्री पळून जाणार होते. याबाबतची माहिती वर्षाच्या लहान भावाला मिळाली. त्यानुसार त्याने बहिणीवर लक्ष ठेवले. त्यानंतर राकेश हा वर्षा हिच्या घरी आला असता, लहान भावासह इतर तीन जणांनी राकेश याला तसेच वर्षा या दोघांना दुचाकीवर बसवून चोपडा ते वराडे रोडलगत असलेल्या नाल्याजवळ आणले. याठिकाणी वर्षा हिच्या भावाने राकेशच्या डोक्यात गोळी झाडून त्याचा खून केला. यानंतर लहान भावाने बहिण वर्षाचा हिचा रुमालाने गळा दाबून तिचा जीव घेतला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतले आहे. याबाबत संशयित अल्पवयीन भावानेच दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले हे करीत आहेत.