ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; राज्यातील कोल्हापूर, इचलकरंजीसह अमृत योजनेतील 28 शहरांतील वर्षानुवर्षे साचून उभे राहिलेले कचऱ्याचे डोंगर आता नष्ट होणार आहेत. अशा डम्प साईट मोकळ्या केल्या जाणार आहेत. याकरिता बायोमायनिंग प्रकल्प राबविण्यात येणार असून त्याकरिता राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत महापालिका, नगरपालिका क्षेत्रात साठलेल्या जुन्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाणार आहे. त्याद्वारे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार असून त्या जागा पुनर्वापरासाठी मोकळ्या केल्या जाणार आहेत. केंद्र, राज्य आणि संबधित स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याकरिता एकूण 1 हजार 661 कोटी 13 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यापैकी केंद्र शासन 433 कोटी 74 लाख रुपये देणार असून राज्य शासन 598 कोटी 7 लाख रुपये देणार आहे.