महाराष्ट्र, कर्नाटक, आंध-, गोवा, कोकण व अन्य राज्यांतील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामांच्या 56 व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त भव्य अखंड हरिनाम महासप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा उत्सव संपन्न झाला.
पुण्यतिथी दिवशी बाळूमामांचा गाभारा विविध रंगांच्या 10 ते 15 प्रकारच्या फुलांनी सजवला होता. मंदिरावर विद्युत रोषणाई केली होती. देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्याहस्ते वीणापूजन होऊन हरिनाम महासप्ताहास प्रांरभ झाला.
पहाटे 4 ते 5 श्रींचे समाधी पूजन, सकाळी 5 ते 6 काकड आरती, सकाळी 7.30 ते 11.30 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 3 ते 4 रामकृष्णहरी जप व बाळूमामा विजय ग्रंथाचे वाचन, दुपारी 4 ते 6 गाथा भजन व हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7 प्रवचन, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन, रात्री 11 ते पहाटे 4 हरिजागर आदमापूर यांची भजन सेवा असे नित्याचे कार्यक्रम झाले.
या महासप्ताहाप्रसंगी ज्ञानेश्वरी पारायन सोहळ्यात 545 वाचकांनी भाग घेतला. ग्रंथ वाचकांना बाळूमामा देवस्थानकडून एक हजार ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करून दिले होते.
या अंखड हरिनाम महासप्ताहात प्रवचनकार व कीर्तनकार हभप अशोकराव कौलवकर (गारगोटी) यांचे प्रवचन तर हभप उदयशास्त्री महाराज (शेळेवाडी – गोटखिंडी) यांचे कीर्तन, हभप पूर्णानंद काजवे (कोगनोळी) यांचे प्रवचन, हभप लक्ष्मण कोकाटे (बारामती) यांचे कीर्तन, हभप इंद्रजित देशमुख (कोल्हापूर) यांचे प्रवचन तर हभप विशाल खोले-पाटील (मुक्ताईनगर) यांचे कीर्तन, हभप नारायण एकल (जोगेवाडी) यांचे प्रवचन, हभप श्रावण अहिरे (नाशिक) यांचे कीर्तन, हभप बाबुराव पाटील (सावर्डे बुद्रुक) यांचे प्रवचन, तर हभप चिदंबर स्वामी (साखरे) यांचे कीर्तन, हभप उद्धव जांभळे (निढोरी) यांचे प्रवचन, हभप बाळासाहेब महाराज (देहूकर) यांचे कीर्तन, दुपारी राजा परांजपे प्रतिष्ठान अभंगरंग कोथरूड-पुणे, हभप प्रशांत सरनाईक (कोल्हापूर) आदी प्रवचनकार व कीर्तनकारांची प्रवचने व कीर्तने झाली. महाप्रसाद होऊन हरिनाम महासप्ताहाची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे बाळूमामा देवस्थान समिती, सद्गुरू बाळूमामा पुण्यतिथी उत्सव समिती, आदमापूर व ग्रामस्थ यांनी काटेकोर नियोजन केले होते. या अखंड हरिनाम महासप्ताहामधील विविध धार्मिक कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.