टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली 22 ऑगस्टला आशिया चषकासाठी यूएईला रवाना होणार आहे. विराट कोहली टीम इंडियासोबत झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर कोहलीने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान त्याने लंडन आणि पॅरिसमध्ये व्हॅकेशन इन्जॉय केले. सध्या तो कुटुंबासह मुंबईत आहे. विराट कोहलीचा व्हॅकेशन मोड अजूनही संपला नाही. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो स्कूटर चालवताना दिसत आहे.
विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत चक्क स्कूटरवरुन मुंबईच्या रस्त्यांवरुन राईड करताना दिसत आहे. हा व्हिडीओ मुंबईच्या मड आयलँड भागातील आहे. एका शूटिंग प्रोजक्टसाठी विराट आणि अनुष्का त्याठिकाणी आले होते. शुटिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्कूटर राईडचा आनंद घेतला. या स्कूटर राईडवेळी दोघांनीही सुरक्षा नियमांचे पालन केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दोघांनीही हेल्मेट घातले होते. विराट आणि अनुष्का बाजूने जात होते तरी देखील कोणालाच कळाले नाही.
विराट कोहलीचे फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. फोटो पाहून असे दिसते की, विराट आणि अनुष्का शूटिंगसाठी स्कूटरवर गेले होते. पावसामध्ये त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर स्कूटर राईडचा आनंद घेतला. दरम्यान, विराट कोहली सध्या आशिया कप 2022 च्या तयारीत व्यस्त आहे. आशिया चषकाच्या तयारीसाठी विराटने चांगलीच कंबर कसली आहे. मुंबईतल्या बीकेसीतील शरद पवार क्रिकेट अकादमीमध्ये तो संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजीचा सराव करत आहे.