ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; गणेश विसर्जन पारंपरिक मार्गाने पंचगंगेतच करण्याचा निर्धार तालीम मंडळांनी केला आहे. तसेच विसर्जन कुंडच बांधू देणार नाही, असा पवित्राही घेतला. त्यासाठी प्रसंगी ठिय्या आंदोलन, रास्ता रोकोसारख्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, या संदर्भातील निवेदन बुधवारी दुपारी साडेतीन वाजता महापालिका आयुक्तांना देण्यात येणार असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
गंगावेश ते पंचगंगा नदी घाट हा पारंपरिक मिरवणूक मार्ग दरवर्षीप्रमाणे सुरू ठेवावा या मागणीसाठी मंगळवारी उत्तरेश्वर तालीम मंडळात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी अनेकांनी गणेशमूर्ती विसर्जनाचा मुद्दा ऐरणीवर आणला. हिंदूधर्माच्या परंपरेप्रमाणे गणेशमूर्ती वाहत्या पाण्यातच विसर्जीत करण्यात याव्यात. त्या विसर्जन कुंडात विसर्जीत करू नयेत. गणेशमूर्ती दान करू नयेत असे सांगण्यात आले. तसेच वर्षभर होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणवादी, प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रशासन काय उपाय-योजना करते ? असा सवालही करण्यात आला.