ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर; गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पाहोचली आहे. ठिकठिकाणी मंडप उभारणीही करण्यात येत आहे. वाहतुकीला अडथळा न करता हे मंडप उभारावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच एक खिडकी योजनेतून परवानगी देतानाही मंडपाची जागा, आकार याची माहिती भरून घेतली जात आहे. तरीही कोणी नियमबाह्य मंडप उभारणी केली आहे का, हे पाहण्यासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.
गणेशमूर्ती विराजमान होणारे मंडप, देखाव्यांसाठीचे सेट उभारणीची कामे सध्या सुरू आहेत. अनेक मंडळांकडून याची माहिती प्रशासनाला दिली जात नाही. यामुळे काही प्रमुख मार्ग या काळात बंद राहिल्याने नागरिकांची गैरसोय होते. हे टाळण्यासोबत एखादी आपत्कालीन घटना घडल्यास मदत पोहोचविण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन आता मंडपांची प्रत्यक्षात तपासणी करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.