भिवंडी शहरात मागील काही दिवसात गृहनिर्माण सोसायटींच्या आवारातून महागड्या सायकली चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यासंबंधीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत नव्हत्या. परंतु, नुकतंच भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल सायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दोन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाख 14 हजार रुपये किमतीच्या 12 महागड्या सायकली जप्त केल्या आहेत.
भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील मामा पावभाजी सेंटर येथे पावभाजी खरेदी करण्यासाठी अरविंद अग्रवाल हा सायकल घेऊन आला होता. सायकल रस्त्यावर पार्किंग करून तो पावभाजी सेंटरमध्ये ऑर्डर देण्यासाठी गेला. पंधरा मिनिटांनंतर तो पुन्हा सायकलकडे गेला असता सायकल चोरीस गेल्याचं त्याला आढळून आलं. त्याने लगेचच भोईवाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.
पोलीस पथकाने गुप्त बातमीदाराच्या मदतीने तपास सुरू केला असता भंडारी कंपाऊंड येथील सदानंद हॉटेल येथे दोन संशयित सायकल घेऊन उभे असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने लगेचच त्या ठिकाणाहून दोघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतलं. यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सायकलसह आणखी एक सायकल हस्तगत केली.त्यानंतर या दोघांकडे कसून चौकशी केली गेली.
चौकशीनंतर त्यांच्या ताब्यातून 2 लाख 14 हजार रुपये किमतीच्या एकूण 12 सायकली जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे या अल्पवयीन मुलास व्हिडिओ रील बनविण्याची हौस असून त्यासाठी महागडा मोबाईल खरेदी करण्याच्या उद्देशाने तो या महागड्या सायकली चोरी करीत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.