बांधकामावरील सेंट्रींगचे साहित्य चोरी करणारी टोळीला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. मिथुन विलास राठोड, शैलेश संजय कांबळे व दत्तात्रय चंद्रकांत मदरे सर्व रा. माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे नऊ लाख पन्नास हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शिरोली एमआयडीसी पोलिसांनी केली असल्याची माहिती करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकावेळी चोरीच्या दोन गुन्ह्यातील सर्व माल हस्तगत केल्याबद्दल उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी शिरोली एमआयडीसी पोलिसांचे कौतुक केले.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, पुलाची शिरोली (सांगली फाटा) येथील हुबाळे मळा परिसरातील बांधकामावरून चोरीस गेलेले सेंट्रींगचे साहित्य विक्रीसाठी कोल्हापूर स्टील परिसरातील एका कच्ची व्यापाराकडे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित परिसरात सापळा लावला. त्याठिकाणी मालवाहतूक करणारी पिकअप हौदा आली. यामध्ये मिथुन राठोड, शैलेश कांबळे व दत्तात्रय मदरे हे तिघे होते. यापैकी शैलेश कांबळे याच्यावर यापूर्वीही चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. पोलिसांनी चौकशी केली असता त्यामध्ये चोरीचे सेंट्रींगचे साहित्य असल्याचे आढळून आले. अधिक चौकशी केली असता सेंट्रींगचे हे साहित्य हुबाळे मळा व शिगे ते शिये रोड लगत असलेल्या पेट्रोल पंपा जवळील मळ्यातून चोरल्याची कबुली संशयितांनी दिली.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक अविनाश पोवार, समीर मुल्ला, नजीर शेख, प्रविण काळे, सतिश जंगम यांनी ही कारवाई केली.
पुलाची शिरोली येथे जप्त करण्यात आलेले साहित्य व संशयित आरोपी सोबत पोलिस उप अधीक्षक संकेत गोसावी, सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील व कारवाईत सहभागी पोलिस कर्मचारी.