कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध गणेशोत्सव मंडळांनी दिलेल्या निवदेनानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 31 ऑगस्टला रोजी गणेश चतुर्थीला सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत डीजे लावण्यास परवानगी दिली आहे. या संदर्भात आदेश जारी करण्यात आला आहे. आवाजाची मर्यादा राखून परवानगी देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशात म्हटले आहे.
ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासुन रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये करता येईल. तथापी कोणत्याही ध्वनी प्रतिबंधित क्षेत्राच्या परिसरामध्ये या आदेशानुसार कोणतीही सुट राहणार नाही. ध्वनीक्षेपक लावण्यासाठी पोलीस विभागाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे.
दुसरीकडे ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी 14 सुटीचे दिवस यापूर्वी घोषित करण्यात आले आहेत. तसेच उर्वरित एक दिवस आवश्यकतेनुसार महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आला असून यानुसार ही सुट देण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबत घोषित करण्यात आलेल्या दिवसांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात गणेश आगमनाची जोरदार तयारी दरम्यान, शहरासह कोल्हापूर जिल्ह्यात गणेश आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. गेल्या दोन वर्षापासून सण साजरा करता न आल्याने यावर्षी सर्वच सार्वजनिक मंडळांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. देखाव्यांसाठी सुद्धा आतापासूनच लगभग सुरु झाली आहे. शहरातील अनेक मंडळांकडून गणेश चतुर्थीची वाट न पाहता मूर्ती आणण्यास प्राधान्य दिले आहे. घरगुती गणरायांच्या तयारीसाठी सुद्धा बाजारपेठ फुलून गेली आहे.